*महासत्ता बनण्यासाठी सुशिक्षित, तंत्रकुशल नेतृत्व गरजेचे हरीवंश यांचे प्रतिपादन; नवव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन*

news24live : 

पुणे : “पूर्वी राष्ट्राच्या प्रगतीसाठी विचार महत्त्वपूर्ण असत. विचारांच्या जोरावरच भारताची उभारणी झाली आहे. मात्र, आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. विकसित तंत्रज्ञानाच्या बळावरच चीनने जलदगतीने प्रगती साधली आहे. आर्थिक महासत्तेच्या या स्पर्धेत आपल्याला टिकायचे असेल, तर विचारांबरोबरच देशाचे नेतृत्व सुशिक्षित व तंत्रकुशल असायला हवे,” असे प्रतिपादन राज्यसभेचे उपाध्यक्ष आणि विख्यात पत्रकार हरीवंश यांनी केले. चारित्र्य आणि मुल्याधिष्ठित शिक्षणही आजच्या पिढीला मिळण्याची गरज असल्याचे हरिवंश यांनी नमूद केले.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, पुणे व भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी पश्‍चिम बंगालच्या विधानसभेचे सभापती श्री. बिमन बॅनर्जी यांना ’आदर्श विधानसभा अध्यक्ष’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र व एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. राजेश टोपे, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते वल्लभश्री भन्साळी, अध्यात्मिक गुरू भाईश्री रमेशभाई ओझा, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष  प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, प्रा. प्रकाश जोशी,डॉ. चंद्रकांत पांडव, श्री. नानिक रूपानी, डॉ. एस.परशुरामन, द रिपब्लिक ऑफ इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल श्री. आडे सुकिन्डर, डॉ. श्रीहरी होनवाड, डॉ. आर.एम.चिटणीस. प्रा. दीपक आपटे व डॉ. एल.के.क्षीरसागर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 
भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल वूमन्स पार्लमेंट आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) यांच्या सहकार्याने ही संसद भरवण्यात आली असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही याला पाठिंबा दिला आहे.
हरीवंश म्हणाले, “देशाच्या जडणघडणीत पुणे नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले आहे. महाराष्ट्र ही संतमहात्म्यांची भूमी आहे. त्यांचा विचार घेऊन एमआयटी ही परंपरा जपत आहे. गांधी विचारांनी देशाच्या स्वातंत्र्याला आणि प्रगतीलाही गती दिली. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाची आर्थिक प्रगती कासवगतीने झाली आहे. आपल्या तुलनेने चीन खूप अंतर पुढे गेला आहे. प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करणार्‍या देशांमध्ये काय प्रकारचे प्रयत्न केले जातात, हे आपण अभ्यासले पाहिजे. शिवाय, शिक्षण बळकट करायला हवे. कारण ज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रित प्रयत्नातून देश प्रगती करु शकेल. आज इथे असलेल्या युवकांनी राजकारणात आले पाहिजे. भारताचे भविष्य उज्ज्वल करण्याचे दायित्व त्यांच्या खांद्यावर आहे. युवकांसमोर अणुयुद्ध, वाढती लोकसंख्या, पर्यावरणाचा समतोल आणि बेरोजगारी ही आव्हाने आहेत. या चार आव्हानांना समोर ठेवून युवकांनी वाटचाल करावी.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा.कराड म्हणाले, “भारतीय संस्कृती अतिशय महान आहे. परंतु, आजची युवापिढी काही प्रमाणात पाश्‍चिमात्य संस्कृतीचे आचरण करत आहे. आपण भारतीय ज्याला अंधश्रद्धा म्हणतो आहोत, अशा गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी परदेशातील अनेक लोक भारताकडे आकृष्ट होत आहेत. आज सिलिकॉन व्हॅलीमध्ये निम्म्याहून अधिक भारतीय आहेत. स्वामी विवेकानंदांच्या भाकिताप्रमाणे भारत एकविसाव्या शतकात ज्ञानाचे दालन म्हणून जगासमोर येत आहे, याचे महत्व लक्षात घेऊन युवकांनी राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे.”
850_4059
राजेश टोपे म्हणाले, “शिक्षणाचे बळकटीकरण करणे आणि राजकारणात सुशिक्षित नेतृत्व असणे खूप गरजेचे आहे. शिक्षणाचा स्तर उंचावला आणि सरस्वतीची पूजा झाली, तरच लक्ष्मी आपल्यासमवेत येऊ शकते. तेजस्वी, तत्पर आणि चारित्र्यवान युवक घडविण्यासाठी शिक्षणसंस्थांनी प्रयत्न करावेत. राजकारणात सुशिक्षितांनी यावे, यासाठी एमआयटी शिक्षणसंस्था करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.”
भाईश्री रमेशभाई ओझा म्हणाले, “राष्ट्राच्या नेत्याने सर्वांचे ऐकले पाहिजे. त्याची इंद्रिये हत्तीसारखी असावीत. कान मोठे, नजर सूक्ष्म असावी. जनतेच्या जीवावर कारभार चालवत असलेले शासन हे गणपतीप्रमाणे असावे. ज्ञानाला उद्यमशीलतेची जोड दिली, तर राष्ट्राचा विकास झपाट्याने होईल.”
वल्लभश्री भन्साळी म्हणाले, “गेल्या सत्तर वर्षात भारत कासवगतीने प्रगती करीत आहे. हे बदलण्यासाठी वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. कामातील सातत्यही तितकेच महत्वाचे आहे. समाजातील समस्या शोधून त्यावर उपाययोजना करणारी समांतर व्यवस्था उभारायला हवी. जी नागरिकांसाठी काम करेल.”
श्री. बिमन बॅनर्जी म्हणाले, “छात्र संसदेच्या व्यासपीठावर मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आनंद वाटतो. विविधता हीच आपल्या भारताची ताकद आणि संस्कृती आहे. सभागृह चालविताना होत असलेला गोंधळ थांबायला हवा. चुकीच्या गोष्टी चांगल्या करण्यासाठी चांगल्या लोकांनी राजकारणात यावे. आमदार, खासदार होणे सोपे आहे, मात्र लोकसेवा अवघड आहे. युवापिढीने लोकसेवा करण्यावर भर द्यावा.”
श्री. आडे सुकिन्डर म्हणाले, “समाजातील प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षणामुळे समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची ताकद आहे.”
प्रा. राहुल कराड म्हणाले, “भारतीय छात्र संसद ही एक प्रयोगशाळा आहे. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून शेकडो आमदार, खासदार आणि मंत्री निर्माण होतील, त्यावेळी आश्‍चर्य वाटणार नाही. या चळवळीच्या माध्यमातून विविध राज्यांतील स्वराज्यसंस्था, विधानसभा जोडण्याचे काम होत आहे. युवकांमध्ये राजकारणाबद्दल विचारमंथन घडवून चांगला समाज निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
आदित्य ब्रह्मे, स्टेफी थॉमस, प्रज्योत गिरिधर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. गौतम बापट, नीलम शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.दीपक आपटे यांनी आभार मानले.