*‘चुंबक’ चित्रपटाला यावर्षीचा संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार*

– ‘गर्ल्स ऑफ दि सन’ या चित्रपटाने पटकावला प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरकार
– अ ट्रान्सलेटर व दिठी चित्रपटांना प्रेक्षकांच्या पसंतीचा (ऑडियन्स अवॉर्ड) पुरस्कार

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार समारोप सोहळा आज कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपटगृहात पार पडला. यावेळी ‘चुंबक’ या चित्रपटाने यावर्षीच्या ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली. तर ‘गर्ल्स ऑफ दि सन’ या चित्रपटाने ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ पटकावला. सदर पुरस्कारांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात केली.

रोख रुपये पाच लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’चे तर रोख रुपये दहा लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’चे स्वरूप आहे. हे दोन्ही पुरस्कार दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येतात.

महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, ‘पिफ’चे निवड समिती सदस्य मकरंद साठे, सतीश आळेकर, अभिजित रणदिवे, अभिजित देशपांडे यांबरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगभरातून आलेले  बी. लेनिन (भारत), क्रिस्टर होमग्रेन (स्वीडन), डॅनिएला सिअॅन्सिओ (इटली), जोसेफ इस्त्राईल लबान (फिलिपिन्स), कमलेश पांडे (भारत), प्रसन्ना विथनेज (श्रीलंका), शबनम घोलीखानी (इराण), थोर्सटन श्युट (जर्मनी) परीक्षक यांबरोबरच सिटी प्राईड कोथरूडचे अरविंद चाफळकर व प्रकाश चाफळकर, एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू सुनील राय हे देखील उपस्थित होते.

पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पार पडणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे १७ वे वर्ष होते. ज्यामध्ये ५६ देशांतील १५० हून अधिक चित्रपटांचा आस्वाद पुण्यातील चित्रपट रसिकांना घेता आला.

यावर्षी संदीप मोदी दिग्दर्शित ‘चुंबक’ या चित्रपटाने ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कार पटकाविला. या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोख रूपये पाच लाख, मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम ही दिग्दर्शक व ५० टक्के रक्कम ही निर्मात्यांना दिली जाते.

याबरोबरच दरवर्षी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा मराठी स्पर्धात्मक विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार यावर्षी सुमित्रा भावे (दिठी) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार स्वानंद किरकिरे (चुंबक) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देविका दफ्तरदार (नाळ)यांना ,सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक पुरस्कार सौरभ भावे व संदीप मोदी (चुंबक)  यांना तर सर्वोत्कृष्ट छायालेखन पुरस्कार धनंजय कुलकर्णी (दिठी) यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रोख रुपये २५ हजार, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय सुमित्रा भावे दिग्दर्शित दिठी या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा (ऑडियन्स अवॉर्ड) पुरस्कार देत गौरविण्यात आले.

याबरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात इवा ह्युसन दिग्दर्शित ‘गर्ल्स ऑफ दि सन’  या चित्रपटाला ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरकार’ देत गौरविण्यात आले. रोख रु. १० लाख मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम ही दिग्दर्शक व ५० टक्के रक्कम ही निर्मात्यांना दिली जाते. तर याच विभागातील ‘प्रभात सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्काराने ‘अ ट्रान्सलेटर’ चित्रपटाचे दिग्दर्शक रॉड्रीगो बॅरिऊसो व सबॅस्टियन बॅरिऊसो या दिग्दर्शकांना गौरविण्यात आले. रोख रुपये ५ लाख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आंतरराष्टीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात ‘ अ ट्रान्सलेटर’  चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा (ऑडियन्स अवॉर्ड) पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तर एफटीटीआयच्या शेवटच्या वर्षाला प्रथम आलेल्या संस्कृती चटोपाध्याय या विद्यार्थीनीला ‘पिफ स्पेशल पुरस्कार’ देत गौरविण्यात आले. यावर्षीपासून पुणे फिल्म फाउंडेशन आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एमआयटी- एसएफटी ह्युमन स्पिरीट’ पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. यावर्षी ‘माय ओन गुड’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पिप्पो मेजापेसा यांना विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू सुनील राय यांच्या हस्ते देण्यात आला.   

#news24live #update_urself