*राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संस्थापना दिनानिमित्त ‘देवदास’ चित्रपटासह दुर्मिळ लघुपटांचे प्रदर्शन*

 

पुणे, २५ जानेवारी #न्यूज24लाईव्ह –
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संस्थापना दिनानिमित्त पुढील आठवड्यात पुण्यातील चित्रपट रसिकांना अत्यंत दुर्मिळ ठरलेले चित्रपट आणि लघुपट पाहण्याची मेजवानी मिळणार आहे. प्रमथेश बारुआ यांनी दिग्दर्शित केलेला आणि भारतीय चित्रपटसृष्टीत अजरामर ठरलेला ‘देवदास’ हा बंगाली चित्रपट यानिमित्ताने रसिकांना दाखविण्यात येणार आहे. सतरा वर्षानंतर ‘देवदास’ ह्या बंगाली चित्रपटाचे भारतात स्क्रीनिंग होत आहे. बांगलादेशच्या चित्रपट संग्रहालयातून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला हा दुर्मिळ चित्रपट मिळाला असून त्याला आता इंग्रजी सबटायटल्सची जोडही देण्यात आली आहे. या चित्रपटात स्वतः दिग्दर्शक प्रथमेश बारुआ यांनी रंगविलेला ‘देवदास’ तसेच त्यांच्या पत्नी जमुना यांनी रंगविलेली ‘पारो’ पाहावयास मिळणार आहे.
दि. एक ते दोन फेब्रुवारी दरम्यान साजरा होत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संस्थापना दिनानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका हिराबाई बडोदेकर तसेच सरस्वती राणे यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रित रागदारी आणि पं. गोविंदबुवा बुऱ्हाणपूरकर यांचे अनोखे पखवाजवादनही ऐकायला मिळणार आहे.
यानिमित्त १९५० साली रॉय किणीकर यांनी दिग्दर्शित केलेला पुण्यातील राजा केळकर या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संग्रहालयावरील लघुपट पाहावयास मिळणार असून या लघुपटात लोकसभेचे पहिले सभापती जी. व्ही. उर्फ दादासाहेब मावळंकर, तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ आणि पुण्याचे पहिले आयुक्त स.गो.बर्वे यांची दुर्मिळ टिकाटिप्पणी ऐकावयास मिळणार आहे. तसेच १९१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘बिल्वमंगल; या मूक चित्रपटाचे काही अंशतः भाग पाहावयास मिळणार आहेत. ‘एल्फिन्स्टन बायोस्कोप’ या बॅनरखाली निर्माण करण्यात आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रुस्तमजी दोतीवाला यांनी केले होते. मदन थिएटर्सशी संबंधित असलेली ‘एल्फिन्स्टन बायोस्कोप’ ही कंपनी नंतर मूक चित्रपटाच्या जमान्यातील एक प्रभावशाली कंपनी म्हणून नावाजली होती.
याशिवाय सुप्रसिद्ध निर्माते ताराचंद बडजात्या यांनी ‘ ऑरो फिल्म्स’ च्या बॅनरखाली निर्मित केलेला आणि फानी मुजुमदार यांनी दिग्दर्शित केलेला पॉंडिचेरीतील अरविंदो आश्रमावरील दुर्मिळ लघुपटही रसिकांना पाहावयास मिळणार आहे. सुप्रसिद्ध कवी केशवसूत यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास तयार करण्यात आलेला ‘कवींचा कवी’ हा लघुपटही दाखविण्यात येणार असून त्यामध्ये सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि गायलेल्या केशवसुतांच्या काही दुर्मिळ कविता ऐकावयास मिळणार आहेत. याशिवाय महर्षी अण्णासाहेब कर्वे, तसेच तंजावर, मदुराई, कोंकण, दिल्ली काश्मीर आदी प्रेक्षणीय स्थानांवरील लघुपटही दाखविण्यात येणार आहेत.
यानिमित्त १९८२ साली मुंबईत झालेल्या कामगारांच्या संपावर आधारित तयार करण्यात लघुपट हेही एक प्रमुख आकर्षण राहणार आहे. श्री प्रदीप दीक्षित यांनी लघुपट दिग्दर्शित केला आहे. याशिवाय ‘आजचे पुणे, सोलापूर, अहमदनगर’ आणि ‘आजचे सांगली, कोल्हापूर, सातारा’ या लघुपटांतर्गत १९६० साली दुसऱ्या पंचवार्षिक योजनांतर्गत झालेल्या त्या त्या शहरांचा विकासकांमांचा घेण्यात आलेला आढावाही पाहावयास मिळणार आहे.
शुक्रवार दि. १ फेब्रुवारी आणि शनिवार दि. २ फेब्रुवारी २०१९ रोजी लॉ कॉलेज रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात हे दुर्मिळ लघुपट आणि चित्रपट दाखविले जाणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संस्थापना दिनाचे निमित्त साधून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात अलीकडेच प्राप्त झालेले हे दुर्मिळ लघूपट आणि चित्रपट रसिकांना दाखवून त्यांना आगळावेगळा आनंद देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या खास कार्यक्रमांचा रसिकांनी अवश्य फायदा घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम यांनी केले आहे.

#news24live #update_urself