*विश्‍वराजबाग,लोणी काळभोर येथे शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण*

युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे आवाहन
विश्‍वराजबाग, लोणी काळभोर येथे  शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण
पुणे, news24live.in: “शिवछत्रपती महाराजांचे विचार हे संपूर्ण मानवजात व समाजासाठी आवश्यक असून ते प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे समाजातील प्रत्येक घटकासाठी केले जाईल. अशा वेळेस आपण गैरसमज काढून टाकले पाहिजेत. युगा युगामध्ये एखादीच व्यक्ती अशी जन्माला येते. त्यामुळे या युगपुरूषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले. 
शिवजयंतीच्या दिवशी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे व एमआयटी एडीटी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्यातर्फे संपूर्ण जगातील एकमेवाद्वितीय असा एक महान आदर्श जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरूष व संपूर्ण जगासमोर इतिहास घडविणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या परिसरात, विश्‍वराजबाग, लोणी काळभोर, पुणे झाला. यावेळी शरद पवार बोलत होते.
850_2364
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे अध्यक्ष मा. श्री. रामराजे नाईक निंबाळकर हे होते. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल  श्रीनिवास पाटील, सातार्‍याचे आमदार श्री. शिवेंद्रराजे भोसले व आमदार बाबूराव पाचर्णे आणि जगविख्यात संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश घैसास, एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, डब्ल्यूएचओचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले,“भारतात अनेक राजे होऊन गेले व त्यांना त्यांच्या घराण्यांनी ओळखले जाते. परंतू छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे हिंदवी स्वराज्याच्या नावाने ओळखले जाते. ते रयतेचे राजे असून त्यांनी उत्तम प्रकारे प्रशासन केले. त्यांना दूरदृष्टी, आधुनिकता, भविष्यवेध, कर्तृत्व होते. हा शेतकर्‍यांचा राजा होता.”
शिवाजी महाराज हे भारतातले असे पहिले राजे होते ज्यांनी सागरी मार्गाचा उपयोग केला. त्यांनी संकटांना ओळखून सागरी आरमार उभे केले. समाज आणि राज्य यांचा समन्वय साधला. त्यासाठी समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले. त्यांच्या सैन्यदलात मुस्लिम सहकारी होते. त्यांचा उपयोग त्यांनी राज्य चालविण्यासाठी केला. धर्माधर्मात त्यांच्या विचारांची संकुचितता सांगितली जात असेल तर ते चालणार नाही. 
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले,“स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकारण वेगळे होते. आज राजकारणाची परिभाषा बदलली आहे. त्यामुळे येथील राजकारणाचे शिक्षण देणार्‍या संस्थेने सर्वांना योग्य दिशा दयावी.”
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “सुंदर परिसरात या वास्तूचा आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनुभव येत आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात सर्व धर्मातील घटकांचा समावेश केला.”
बाबूराव पाचर्णे म्हणाले,“ डॉ. कराड यांची भावना जगाला संदेश देणारी आहे. अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही पैकी अध्यात्माची ताकद मोठी आहे. विज्ञानाच्या पलिकडेही अध्यात्माची मोठी ताकद आहे. घुमटा बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. त्यामुळे हे कार्य पूर्ण झाले.”
850_2375
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “शिवाजी महाराज यांचा संदेश जगासमोर पोहचावा या निमित्ताने शरद पवार साहेब आज येथे आले. हे उचित आहे. मानवतेचा संदेश देण्यासाठी या घुमटाची निर्मिती झाली आहे. स्वामी विवेकांनद यांनी सांगितल्यानुसार २१वें शतक हे भारताचे असून विश्‍वगुरू म्हणून उदयास येणार आहे. भारत देशच जगाला सुख, शांती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवेल.”
यानंतर श्रीनिवास पाटील यांनी विचार मांडले.
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. 
प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड  यांनी आभार मानले.
news24live.in #update_urself