*”कोयता – एक संघर्ष” या मराठी चित्रपटाचे पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पोस्टर, म्युझिक व ट्रेलर लॉंच संपन्न.*

ऊस तोड कामगारांचा संघर्ष “कोयता’ द्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
गेला पाहिजे – बाळासाहेब सानप

पुणे news24live – ऊस ताेड कामगारांचा संघर्ष “कोयता’द्वारे महाराष्ट्राच्या
कानाकोपऱ्यात गेला पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये ऊस तोड कामगारांची संख्या
जास्त आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या जगण्याचा संघर्ष, त्यांचे शोषण,
त्यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम कोयता-एक संघर्ष
चित्रपटात केलं आहे, असे मत औरंगाबाद महानगरपालिकेचे नगरसेवक व जय भगवान
महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी “कोयता एक संघर्ष’
चित्रपटाच्या पोस्टर, म्युझिक व ट्रेलर लॉंच प्रसंगी पुण्यात व्यक्त
केले. याप्रसंगी कोयता चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन चव्हाण, निर्माते
श्यामसुंदर  बडे, दशरथ गोडसे,अभिनेत्री प्रियांका मलशेट्टी,अभिनेत्री श्री
मेसवाल, अभिनेता   रमेश राज,कोयताचे लेखक प्रल्हाद उजागरे, यश
एंटरप्रायझेसचे विजय बागल, प्राजक्ता सकटे, अरुण बर्गे, दिग्दर्शक शिवा
बागुल, चित्रपट वितरक अतुल कदम,
प्रणिती खडके आदीसह कोयता-एक संघर्ष या मराठी चित्रपटातील कलाकारांची टीम
उपस्थित होती. मथुरा फिल्म्स निर्मित व श्री यश एंटरप्राईजेस, दशरथ गोडसे
व रमेशराज मनोहर बिरादार प्रस्तुत कोयता-एक संघर्ष या मराठी चित्रपटाचे
पोस्टर, म्युझिक व ट्रेलर लॉंच पुण्यातील श्रमिक पत्रकार भवन, श्रमिक
पत्रकार संघाच्या सभागृहात संपन्न झाले.

      पुढे बोलताना बाळासाहेब सानप पुढे म्हणाले की, उसतोड कामगारांना
कामामुळे स्थलांतर करावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण
अर्धवट वाहते व काहींचे तर शिक्षणच होत नाही. त्यामुळे या मुलांना ऊस
तोडणी कामाशिवाय पर्याय राहत नाही. तसेच ऊस तोडणी कामगारांना उस तोडल्या
शिवाय त्यांच्या मुलींचे लग्नच होत नाही व या लग्नासाठी या कामगारांना
मुकादमाकडून उचल घ्यावी लागते. बीड जिल्ह्यात अजून एकही एम.आय.डी.सी.
सुरु झाली नाही.  त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे
बेराजगारांना उस तोडणी कामा शिवाय पर्याय नसतो. हे धादांत वास्तव बीड
जिल्हा व इतर महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील ऊस तोडणी कामगारांचे आहे.
अनेक आमदार, खासदार व मंत्री बीड जिल्ह्यामध्ये असतानाही या जिल्ह्यात
एकही एम.आय.डी.सी. सुरु झाली नाही. कोयता-एक संघर्ष या चित्रपटात हा ऊस
तोड कामगारांचा संघर्ष पडद्यावर जिवंत करण्याच काम चेतन चव्हाण यांनी
केले आहे.

20190521_023828
      चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन चव्हाण आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले
की, ” ऊस तोड कामगारांचा प्रश्न हा महाराष्ट्रात ज्वलंत वास्तववादी
विषय आहे. या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम मी कोयता-एक संघर्ष
चित्रपटातून केले आहे. या चित्रपटाचे लेखक प्रल्हाद उजागरे यांनी स्वतः
ऊस तोड केलं आहे. या चित्रपटात रमेश नावाचा नायक व त्याच्या पत्नीचे
कथानक व त्यांचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाचा तीन
वर्षापासून निर्मितीचा प्रवास सुरु आहे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून हा
चित्रपट बनविला आहे. लहानपणापासून उसतोड कामगारांना जवळून पाहात आलो आहे.
या ऊस तोड कामगारांचा संघर्ष हा आता त्यांच्या जगण्या मरण्याचा संघर्ष
झाला आहे. त्याचे वास्तवदर्शन मी या चित्रपटाद्वारे दाखविले आहे.

      आपल्या भाषणात लेखक प्रल्हाद उजागरे म्हणाले की, माझे आई वडिल ऊस
तोडणीचे काम करत होते. मीही स्वतः 15 वर्षे ऊस तोडणीचे काम केले आहे.
त्यामुळेच मला हातात कोयता घेण्याची वेळ आली. मी कथा लिहून चित्रपटाचे
शिर्षक लिहिले नाही तर प्रथम शिर्षक लिहून कथानक लिहिले आहे. मला पहिल्या
पासूनच कथा कविता लिहिण्याचा छंद होता. 2004 सालापासून कोयता हा विषय
डोक्यात चित्रपट करण्यासाठी होता. माझ्या मनात या उसतोड कामगारांच्या
संघर्षा विरुध्दचा राग होता. ऊसतोड कामगारांचे कष्ट व मेहनत यामुळेच हा
चित्रपट लिहिण्याचे धाडस मी केले आहे.

कार्यक्रमात चित्रपटातील दिग्दर्शक निर्माते, कलाकार व तंत्रज्ञ
प्रेक्षकांशी मनोगत व्यक्त केली आहेत. प्राजक्ता सकटे यांनी चित्रपटातील
पाव्हणं पाव्हणं या गीतावर प्रत्यक्ष लावणी नृत्य रंगमंचावर यावेळी सादर
केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहूल कोळी यांनी केले.

या चित्रपटामध्ये चल रं गड्या (कोरस गीत), आनंद शिंदे यांचे चल गं पोरी,
आदर्श शिंदे यांचे कोयता चालला, राधिका अत्रे यांचे पाव्हणं पाव्हणं
लावणी ही चार गीते सादर करण्यात आली आहेत. या चित्रपटाचे पटकथा लेखन व
दिग्दर्शन चेतन चव्हाण यांनी केले असून चित्रपटाचे निर्माते श्यामसुंदर
बडे, कृष्णा बडे, सूर्यकांत बिरादार , शंकर गिरी, प्रशांत भोईर आहेत. तर
या चित्रपटाचे सहनिर्माते अतुल भांडवलकर, पवन सरवदे, राज सरवदे आहेत.

      या “”कोयता-एक संघर्ष” चित्रपटाची कथा प्रल्हाद उजागरे यांनी
लिहिली आहे. तर चित्रपटाचे छायाचित्रण सतीश सांडभोर यांनी केले आहे. तर
स्थिरचित्रण हरीश रेड्‌डी यांनी केले आहे. तसेच चित्रपटाचे कला दिग्दर्शन
रमेश कांबळे यांनी केले आहे. या चित्रपटाचे पार्श्वगायन आनंद शिंदे व
आदर्श शिंदे, राधिका अत्रे यांनी केले आहे. चित्रपटाचे कार्यकारी
निर्माते विजय देवकर, मनोहर बिरादार, अरुण बर्गे आहेत. या चित्रपटातील
कलाकार रमेश राज, अभिनेते प्रकाश धोत्रे, प्रियांका मलशेट्टी, श्री
मेसवाल, सुहासिनी चक्रे, अमर कसबे, वैशाली खिलारे यांनी भूमिका साकारल्या
आहेत. या चित्रपटातील बालकलाकारांची भूमिका साक्षी आंधळे हीने साकारली
आहे. चित्रपटाचे संवाद लेखन चेतन चव्हाण यांनी केले असून अविनाश जमदाडे
यांनी वेशभूषा केली आहे. या चित्रपटाचे संकलन चेतन सागडे, शिवगणेश यांनी
केले आहे. हा चित्रपट 24 मे 2019 पासून सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित
होणार आहे.

news24live.in #update_urself #news24live