*हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर* 

पुणे : ता. २५ विवेककुमार, प्रतिनिधी :-  हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हृदयविकार होऊ शकतो. हृदयविकाराला वयाची अट नसते,कोणत्याही वयोगटातील माणसाला हा आजार होऊ शकतो असे मत सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ ईश्वर झंवर यांनी व्यक्त केले.

               हिराबाई भिकाजी माने यांच्या पुण्यानुमोदनाच्या वेळी ते बोलत होते. कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल माने यांच्या मातोश्री हिराबाई माने यांचे रविवार दि. १८ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.श्रध्दांजली सभेस उपस्थित असणारे लोक गेलेल्या व्यक्तिच्या आठवणी जागवतात मात्र त्या आजाराबाबत जनजागृती करत नाहीत. सुनील माने यांनी डॉ. ईश्वर झंवर यांचे ‘ह्रदयविकाराची प्राथमिक लक्षणे’याविषयावर व्याख्यान आयोजित केले.अशाप्रकारचा कार्यक्रम घेऊन त्यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. लोकांना हृदय विकाराविषयी माहिती व्हावी, हृदय विकाराचा झटका आल्यानंतर कोणते प्रथोमपचार करावे हा त्यामागचा उद्देश होता.

              डॉ. झंवर म्हणाले, पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतात हृदय रोग होण्याचे वय कमी आहे. हृदय रोग होणाऱ्या व्यक्तींमध्ये पन्नास टक्के रुग्ण हे ३० ते ४० वर्ष वयोगटातील असतात. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर प्रत्येकाने हृदयाशी संबंधित लक्षणांना गांभीर्याने घेणे आवश्यक असते. मधुमेहाच्या रुग्णांना हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. तिशीनंतर प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तुमच्या कुटुंबात रक्ताच्या नात्यात कोणाला हृदयरोग झाला असेल तर तुम्हाला हृदय रोग होण्याची शक्यता अधिक असते. हृदय रोगामुळे तुम्हाला तुमच्या मेंदू आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार होऊ शकतात. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल या तीन गोष्टी नियंत्रणात ठेवल्यास तसेच धूम्रपान,मद्यपान न केल्यास हृदयरोगाचा धोका टाळता येवू शकतो. आहार, विहार व जीवनशैली उत्तम ठेवल्यास आपण हृदयविकारावर मात करू शकतो.

 20190825_212414

       हिराबाई माने यांना श्रद्धांजली वाहताना मिलिंद कुलकर्णी यांनी आई विषयी कवितांचे सादरीकरण करताना उपस्थितांचे अश्रू अनावर झाले.निवृत्त आयपीएस अधिकारी अशोक धिवरे यांनी आईचे जीवनातील अस्तित्व शब्दापलीकडे असल्याने तीला चाकोरीत बांधता येत नसल्याचे सांगितले. आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर, प्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक अंबरीश दरक, विशाल तांबे यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पुणे महानगरपालिकेचे शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेवक उमेश गायकवाड, दीपक पोटे, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, अजय खेडेकर, उज्ज्वल केसकर, जयंत येरवडेकर, दत्ताजीराव गायकवाड यांच्यासह विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

news24live.in #update_urself