*महिला अत्याचाराची प्रकरणे फास्टट्रॅक न्यायालयात चालवावीत : सीमा आठवले*

 

सीमाताई आठवले यांची मागणी; रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयाला भेट 

पुणे news24live : “देशभरात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणत वाढ झाली असून, याला आळा घालण्याकरिता सरकारने कडक कायदे करावेत. आरोपीना तात्काळ शिक्षा देण्यासाठी ही प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवावीत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) राष्ट्रीय नेत्या सीमाताई आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

शनिवार पेठ येथील पक्षाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी सीमाताई आठवले बोलत होत्या. यावेळी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, युवक शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, भाजपच्या पदाधिकारी स्वरदा बापट, रमेश मुळे, ऍड चित्रा वानुगडे, बेला मेहता आदी उपस्थित होते.

सीमा आठवले म्हणाल्या, “महिला सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. विकृत मानसिकतेला ठेचण्यासाठी कडक पावले उचलायला हवीत. महिला सुरक्षेसाठी, शेतकऱ्यांसाठी, झोपडीधारकांसाठी, भूमिहीनांना जमिनी देण्यासाठी ‘रिपाइं’ने रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलने केली. नागरिकत्व कायद्याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व आमचा पक्ष सरकारसोबत आहे. राज्यभर एक कोटी सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने काम सुरु असून, २ एप्रिलपर्यंत हे पूर्ण करणार आहोत. यामध्ये महिलांनाही मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येणार आहे.”

स्वरदा बापट यांनीही मनोगत व्यक्त केले. ऍड. मंदार जोशी म्हणाले, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष कोणत्या एका जातीपुरता मर्यादित नसून, सर्व धर्म जातीच्या नागरिकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. सर्वाना एकत्रित राहण्यासाठी एक कोटी सभासद नोंदणी अभियान सुरु असून त्याला देखील चांगला प्रतिसाद आहे. सुत्रसंचलन ऍड. मंदार जोशी यांनी केले. शैलेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.

news24live.in #update_urself