इस खबर को सुनें

*मधुश्री पब्लिकेशन व पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यताप्राप्त आयोजित मुक्ता मनोहर लिखित एक वादळी सुर -बंतसिंग पुस्तकाचे पंडित राजेंद्र मनेरिकर व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न*

पुणे -“बंतसिंगांवरील पुस्तक हे वाचकांना खिळवून टाकणारं व त्यांच्या जाणिवा विस्तीर्ण करणारं पुस्तक असून गेल्या दहा वर्षात मराठी साहित्यात इतकं परिश्रम पूर्वक लिहिलेलं पुस्तक आलं नाही. त्याचे लिहिण्याचे चांगले काम मुक्ता मनोहर यांच्याकडून झाले आहे”,असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी मुक्ता मनोहर लिखित एक वादळी सुर- बंतसिंग या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी केले.मधुश्री पब्लिकेशन व पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यताप्राप्त आयोजित पुणे महानगरपालिका कामगार युनियन यांच्या जनरल सेक्रेटरी व लेखिका कॉम्रेड मुक्ता मनोहर यांनी लिहिलेल्या एक वादळी सुर बंत सिंग या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आवाज शास्त्राचे जाणकार पंडित राजेंद्र मणेरीकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक , विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यातील एस एम जोशी सभागृह येथे नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर , पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे कार्याध्यक्ष चंद्रकांत गमरे, मधुश्री पब्लिकेशनचे शरद अष्टेकर,पुणे महानगरपालिकेच्या कामगार सल्लागार विभागाचे प्रमुख शिवाजी दौंडकर,मधुकर नरसिंगे, दिलीप कांबळे, सावित्रा भिसे, पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात कवी व गझलकार सुरेश भट यांनी लिहिलेल्या भीमवंदनेने पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या लोकशाहीर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे श्रमिक कलापथकाच्या महादेव जाधव,दत्ता शिंदे,प्रकाश चव्हाण,संतोष गायकवाड, राजेश पिल्ले व सहकाऱ्यांनी केली. यानंतर एक वादळी सुर -बंत सिंग या पुस्तकाच्या काही भागाचे अभिवाचन अभिनेते व कलाकार डॉ.समीर मोने,लेखिका मुक्ता मनोहर यांनी केले व त्यास शास्त्रीय गायनाची साथ मधुवंती देव यांनी दिली.

पुढे बोलताना डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले की , “एक वादळी सुर बंतसिंग या पुस्तकात माणसाची जगण्याची दुर्दम्य इच्छा लेखिकेने मांडली आहे. या पुस्तकात जागतिक राजकारण, परराष्ट्र धोरण, डाव्या पक्षाची भूमिका, सामाजिक व राजकीय संघर्ष लेखिकेने मांडला आहे. माणसाला समजून घ्यायचे असेल तर तो दोन जगात जगत असतो. एक त्याचे बाह्य जग ज्याच्यात तो संघर्ष करत असतो कारण त्याच्यासमोर अनेक प्रश्न असतात. पहिला प्रश्न असतो भाकरीचा. कारण विज्ञानाने कितीही शोध लावले तरी भाकर काही डाऊनलोड होत नाही,ती कमवावी लागते. बाह्य जग अफाट असते. बाह्य जग जितके अफाट आहे तितकेच अफाट जग अंतरंगात आहे. ज्याचे स्वतःच्या अंतरंगाकडे दुर्लक्ष होते तो माणूस क्रांती करू शकत नाही. म्हणून भारतामध्ये क्रांती होणं शक्य नाही.”

आपल्या भाषणात राजेंद्र मणेरिकर म्हणाले की, “सामाजिक जीवनातली लढाई व त्यातून उमटणारे सूर हे कसे जुळवायचे हा प्रश्न अनेक वर्षापासून मला पडला होता. आपली मनस्थिती असते तसा आवाज बदलतो. संघर्षाचा म्हणून एक आवाज असतो जो माझ्यापर्यंत पोहोचायला इतकी वर्षे लागली. अतिशय अवघड विषय लेखिका मुक्ता मनोहर यांनी सुंदर पद्धतीने मांडला आहे”

मुक्ता मनोहर आपल्या प्रास्ताविक पर भाषणात म्हणाल्या की, “बंतसिंग हे ब्लॅक होल सारखे आहेत. संगीतमय प्रवासामध्ये माझी खूप धडपड होती. आपल्याला तळागाळातील माणसं,उच्चभ्रू माणसं आणि त्यातलं लपलेलं विज्ञान यातले काही धागे सापडले तर बंतसिंगांवरचे पुस्तक मनासारखं करता येईल आणि ते करण्याची धडपड मी केली. पुणे महानगरपालिका कामगार युनियन ही माझ्यामागे अतिशय खंबीरपणे माझ्यामागे उभी राहिलेली आहे. त्यामुळे मी अशा प्रकारचे धाडस करू शकले. संगीताला विज्ञानाची जोड देण्याचं काम मणेरीकरांनी केले आहे. ”

या कार्यक्रमात रत्नकला मनोहर स्मृती पुरस्कार पत्रकार व संवेदनशील लेखिका अमिता नायडू यांना रोख दहा हजार रुपये व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच सुमती करंजीकर स्मृती पुरस्कार पुणे जिल्हा मोलकरीण संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या चंद्रभागा सपकाळ यांना कष्टकरी कामगार यांच्याकरिता केलेल्या कार्याबद्दल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमात राजीव साने यांनी रचलेली बंदिश राग भीमपालास गायक प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे यांनी सादर केली. तसेच गायिका मुग्धा बापट यांनी बंतसिंग यांच्या पुस्तकावर राग मुलतानी सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी जयंत केजकर यांचे शिष्य व सहकारी यांनी अनुरणीया ठोकडा तुका आकाशाएवढा हा तुकारामांचा अभंग सादर केला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संदीप मोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे कार्याध्यक्ष चंद्रकांत गमरे यांनी मानले.

@news24live #update_urself